डोंबिवली शहराचे वैशिष्ट्य हे आहे कि हे शहर कोणत्याही राजाने, सरदाराने, वा खोताने वसविलेले नाही. तत्कालीन परिस्थितीत सामान्य लोकांच्या गरजा व आकांक्षा यातून या शहराची निर्मिती झाली आहे. सन १९१८ मध्ये पहिल्या महायुद्धाची समाप्ती झाली. त्यानंतर महागाई झाली व राहण्याच्या जागांची टंचाई भासू लागली. त्यातून काही लोकांच्या मनात डोंबिवलीत घरे बांधावी असे आले व त्यानुसार सरकारी नोकर व मध्यम वर्गीय लोक डोंबिवलीत राहण्यासाठी येऊ लागले. येथे पाथरवटांची आळी होती त्यास पाथर्ली, ठाकुरांची आळी होती त्यास ठाकुर्ली, व डोंबांची वस्ती होती त्यास डोंबिवली म्हणत असत. डोंबिवली गाव पुरातन आहे. इतिहासकालीन ठाणे व कल्याण येथे होणाऱ्या राजकीय घडामोडींशी या भागाचा अंशतः संबंध होता. परंतु इतिहासात फार काही नोंदी नाहीत.
![]() |
Ganesh Mandir |
ऐतिहासिक नोंदी :-
तुर्भे बंदराजवळील माहुल गावी शिलाहार राजा हरिपालदेव ह्याचा शके १०७५ (सन ११५३) मधील एक लेख सापडला असून त्यात "डोंबिल वाटिका " असा उल्लेख आहे.
डोंबिवलीच्या पूर्वेस मानपाडा रस्त्यावर गावदेवी मंदिराच्या बाजूला एक ऐतिहासिक शिलालेख आहे तो इसवी सन १३९६ मधील आहे. त्यात श्री आलुनाकु या नावाचा राजा ठाण्यावर राज्य करत होता व त्याने केलेले दानपत्र नमूद आहे. याने आपला सेवक जसवंत दळवै याला आठगावामधील (अष्टागर ) डोंबिवली नावाचे गाव दान केले आहे. असा शिलालेखात उल्लेख आहे.
अणजूरच्या नाईक घराण्याच्या इतिहासात व इतर पत्रव्यवहारात व दीक्षित भटजी यांना दिलेल्या बक्षीस पत्रातून "डोंबोली" असा उल्लेख सन १७३० सालचा असल्याचे आढळले आहे.
याशिवाय हे शहर खोलगट भागात असल्याने ज्याला हुवाली म्हणतात त्यावरूनच डोंबिवली हे नाव पडले असावे. डिसेंबर १९२१ या महिन्यात ग्रामपंचायत अस्तित्वात आली लकै मणीलाल ठाकूर हे या ग्रामपंचायतीचे पहीले अध्यक्ष तर कै बहिराव अभ्यंकर हे पहीले सरचिटणीस होते. ग्रामपंचायतीच्या स्थापनेनंतर १९३१ साली वीजपुरवठा सुरु झाला. १९३६ साली पंचायत विहीर बांधण्यात आली. वीज व पाणी आल्यामुळे या शहराची वस्ती वाढू लागली. १९५८ साली सप्टेंबर महिन्यात नगरपालिका अस्तित्वात आली. या नगरपालिकेचे उद्घाटन आमदार कृष्णराव धुळप यांच्या हस्ते झाले आणि कै वि पो तथा बापूसाहेब पेंडसे यांनी पहिल्या अध्यक्ष पदाचा कार्यभार सांभाळला. १९८३ साली कल्याण डोंबिवली महानगर पालिका स्थापन झाली व सौ आरती मोकल या पहिल्या महापौर झाल्या. या शहराने आजतागायत सांस्कृतिक नगर अशी आपली वेगळी ओळख जपली आहे.
फडके रोड
ज्या फडके रस्त्याने डोंबिवलीतील तरुणाईला भुरळ घातली त्या रस्त्यासही इतिहास आहे. १८५७ च्या काळात स्टेशन वर येण्याजाण्यासाठी रस्ता नाही हे ओळखून त्यावेळचे लोकल बोर्डाचे लोकनियुक्त अध्यक्ष सखाराम गणेश तथा बापूसाहेब फडके यांनी पुढाकार घेत एक रस्ता तयार केला. याच रस्त्याला त्यांचेच नाव द्यावे असा ठराव गावकीच्या सभेत झाला - तोच आजचा फडके रस्ता.
सदरचा इतिहास अनेक पुस्तकांमधून व जुन्या वृत्तपत्रांमधून सारांश घेत वाचकांना सादर करीत आहोत
लोकसंख्या (२०११)
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - १२,४७,३२७
पुरुष - ६,४९,६२६
महिला - ५,९७,७०१
साक्षर व्यक्ती - १०,२९,०४१
साक्षरता प्रमाण - ९१. ३७ %
पुरुष टक्केवारी - ९३. ७३ %
महिला टक्केवारी - ८८. ८१ %
लिंग गुणोत्तर – ९२०
डोंबिवली रेल्वे स्थानक
डोंबिवलीतील लोकांच्या भावविश्वात डोंबिवली रेल्वे स्थानकाला अढळ स्थान आहे. डोंबिवलीहून मुंबईला पोहचण्यासाठी रेल्वे हे सर्वात वेगवान वाहतुकीचे साधन आहे. त्यामुळे रोज लाखो डोंबिवलीकर लोकलने मुंबई गाठतात.
डोंबिवली रेल्वे स्थानक मध्य रेल्वेवर असून मुंबई सी. एस. टी. पासून ते तेवीसावे स्थानक आहे व सी. एस. टी. पासून ४८ किमी अंतरावर आहे. या स्थानकात पाच प्लॅटफॉर्म असून तीन पूल व दोन सरकता जिने आहेत. हे रेल्वे स्थानक सन १८८६ मध्ये बांधण्यात आले असून सन १९५३ मध्ये त्याचे विद्युतीकरण झाले. सध्या डोंबिवलीहून अनेक लोकल्स सुटतात. डोंबिवलीला सर्व वेगवान आणि धीम्या लोकल्स थांबतात. प्रचंड गर्दी असली तरी मुंबईला पोहचण्यासाठी रेल्वे हेच एक वेगवान वाहतूक माध्यम आहे.
डोंबिवलीतील ग्रंथालय व वाचनालये
अनेक सुशिक्षितांचे शहर असणाऱ्या डोंबिवलीत समृद्ध ग्रंथालये व वाचनालये असून ती डोंबिवलीकरांची वाचनाची आवड जोपासत आहेत. विविध विषयांवरील असंख्य पुस्तके या ग्रंथालयात व वाचनालयात संदर्भासाठी तसेच घरी नेण्यासाठी उपलब्ध आहेत. पुस्तके विकत घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी सुद्धा अद्ययावत पुस्तक विक्री केंद्रे डोंबिवलीत कार्यरत आहेत. आज हजारो डोंबिवलीकर या विक्री केंद्रांचा आणि वाचनालयांचा लाभ घेत आहेत. अनेक वाचनालये संगणकीकृत असून ऑनलाईन सुद्धा पुस्तक नोंदवता येते.
डोंबिवलीतील काही पुस्तक विक्री केंद्रे
मॅजेस्टिक बुक स्टॉल, ज्ञानदा ग्रंथ वितरण, शारदा ग्रंथ वितरण, ललित ग्रंथ सागर, बुक कॉर्नर, गणेश बुक डेपो, बागडे स्टोअर्स, गद्रे बंधू, रसिक बुक डेपो.
डोंबिवलीतील काही वाचनालये
डोंबिवली ग्रंथ संग्रहालय - पूर्व, डोंबिवली ग्रंथ संग्रहालय - पश्चिम, श्री गणेश मंदिर संस्थान वाचनालय, ब्राह्मण सभा वाचनालय, बुक कॉर्नर, श्री स्वामी समर्थ ग्रंथालय व संदर्भ ग्रंथालय, साईनाथ वाचनालय (आता बंद ), रसिक वाचनालय, सावरकर बालवाचनालय, विकास वाचनालय (आता बंद), अमृता वाचनालय, रीडर्स कॉर्नर, योगायोग वाचनालय.
याशिवाय संपूर्ण वर्षभरात विविध संस्थांकडून डोंबिवलीत ग्रंथ प्रदर्शने भरवली जातात. त्यांनाही डोंबिवलीकर रसिक चांगला प्रतिसाद देतात. आतापर्यंत अनेक नामवंत संस्थांनी अशी प्रदर्शने डोंबिवलीत भरवली आहेत. त्यापैकी काही संस्था खालीलप्रमाणे आहेत.
ज्ञानदा ग्रंथ वितरण, आरती प्रकाशन, अक्षरधारा, बुक कॉर्नर, ग्रंथाली, मॅजेस्टिक प्रकाशन, नॅशनल बुक ट्रस्ट, चिल्ड्रन बुक ट्रस्ट, विकास वाचनालय (आता बंद).
डोंबिवली - एक साहित्य नगरी
डोंबिवली हे ठाणे जिल्ह्यातील एक ख्यातनाम शहर असून त्यास महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी म्हणतात. सांस्कृतीक राजधानी असलेल्या पुण्याखालोखाल डोंबिवलीत अनेक सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होत असतात. साहित्य, कला, संगीत, नृत्य, नाट्य, आध्यात्मिक आणि वक्तृत्वविषयक विविध कार्यक्रम डोंबिवलीत वर्षभर होत असतात आणि दर्दी रसिक या सर्व कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित असतात. डोंबिवलीत कथा, कादंबरी, प्रवासवर्णने, ललितलेखन आणि कविता लिहिणारे अनेक लेखक व लेखिका निवासाला होते व सध्या राहत आहेत. यापैकी प्रत्येकाने डोंबिवलीचे नाव महाराष्ट्राच्या साहित्य नकाशावर झळाळून टाकले आहे. याचबरोबर साहित्यविषयक अनेक संस्था डोंबिवलीत कार्यरत आहेत व वर्षभर असंख्य कार्यक्रम त्या आयोजित करत असतात.
डोंबिवलीत निवास केलेले काही दिवगंत ख्यातनाम साहित्यिक
कै. श्री. पु. भा. भावे.
कै. श्री. शं. ना. नवरे.
कै. श्री. प्रा. अनंतराव कुलकर्णी.
कै. श्री. व. शं. खानवेलकर.
कै. श्री. राम बिवलकर
कै. श्री. भा. द. लिमये
कै. प्रभाकर अत्रे
डॉ. गॊ. प. कुलकर्णी
कै. श्री. वि. स. गवाणकर
कै. श्री. चित्तरंजन घोटीकर
कै. श्री. स. कृ. जोशी
कै. श्री. ना. ज. जाईल
डॉ. श्री. व. वि. पारखे
कै. श्री. ल. ना. भावे
कै. श्रीमती सुमती पायगावकर
कै. श्रीमती प्रभावती भावे
डॉ. वसुंधरा पटवर्धन
कै. ज. बा. कुलकर्णी
कै. गणा प्रधान
कै. जयंत रानडे
याशिवाय आज साहित्य क्षेत्रात आपल्या लेखन कर्तृत्वाने आपला ठसा उमटवणाऱ्या अनेक साहित्यिकांनी डोंबिवलीत काही काळ वास्तव्य केले. ते आता जरी इतरत्र राहात असले तरी डोंबिवलीकरांना त्यांचा निश्चित अभिमान आहे. त्यापैकी काही ख्यातकीर्त व्यक्तींची नावे खाली दिली आहेत.
श्री. वसंत सबनीस.
श्री. विं. दा. करंदीकर.
श्री. विजय तेंडुलकर.
श्री. गोविंदराव तळवलकर.
श्री. वा. य. गाडगीळ.
श्री. रंगनाथ कुलकर्णी.
श्री. शंकर सारडा.
श्री प्रवीण दवणे.
श्री. म. पा. भावे.
श्रीमती मुक्ता केणेकर
श्री परेन जांभळे.
श्रीमती विनिता ऐनापुरे.
श्रीमती माधवी घारपुरे.
डॉ. महेश केळुसकर.
श्री. विश्वास मेहंदळे.
याचबरोबर डोंबिवलीत आज अनेक कवी, कथाकार, कादंबरीकार, ललित लेखक, इतिहास लेखक, ज्योतिष विषयावरील लेखक आणि विज्ञानलेखक राहत असून आपल्या अजोड साहित्य निर्मितीने डोंबिवलीचेच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राचे साहित्य विश्व समृद्ध करत आहेत. ह्या सर्वांचा नामोल्लेख केवळ जागेअभावी शक्य नाही पण त्यांच्या साहित्य सेवेला आम्ही मनपूर्वक अभिवादन करतो.
डोंबिवलीतील साहित्यविषयक संस्था
सृजनशील लेखक / कवींच्या कला गुणांना उत्तेजन व मार्गदर्शन मिळावे, त्यांना आपल्या साहित्यगुणांचे सादरीकरण करण्यासाठी एक व्यासपीठ मिळावे आणि साहित्यातील नवनव्या प्रवाहांशी त्यांचा परिचय व्हावा यासाठी डोंबिवलीत अनेक साहित्यविषयक संस्था कार्यरत आहेत. या संस्था वर्षभर अनेक उपक्रम हाती घेत आहेत व विविध साहित्यविषयक कार्यक्रम आयोजित करत असतात. यातून प्रस्थापित लेखकांचा नवोदित लेखकांना परिचय होतो व आपणही नवनिर्मिती करावी असे त्यांना प्रोत्साहन मिळते. साहित्याची जाण, प्रसार व निर्मिती यात या संस्था मोलाचे योगदान देत आहेत. या संस्थांपैकी काही साहित्यसंस्थांची नामसूची खालीलप्रमाणे आहे.
डॉ. आंबेडकर मंच, काव्य रसिक मंडळ, कोंकण मराठी साहित्य परिषद, डोंबिवली शाखा, डोंबिवली साहित्य सभा, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे, डोंबिवली शाखा, स्वा. सावरकर अभ्यास मंडळ, साहित्य मंथन, साहित्य मंच, गीता धर्म मंडळ, ज्ञानेश्वरी अभ्यास मंडळ, दासबोध प्रकाश मंडळ, ग्रंथाली वाचक चळवळ, साहित्य चर्च मंच, डोंबिवली, धम्मदीप साहित्य सभा.
डोंबिवलीत संपन्न झालेली विभागीय साहित्य संमेलने
डोंबिवलीत आतापर्यंत अखिल भारतीय साहित्य संमेलन जरी झाले नसले तरी यापूर्वी विविध विभागीय साहित्य साहित्यसंमेलने संपन्न झाली आहेत. संमेलनामुळे साहित्यातूनच समाजात संस्कार झेलण्याची प्रक्रिया वाढते व साहित्याचे प्रभाव क्षेत्र वाढते. याच हेतूने डोंबिवलीत आयोजित केलेल्या विभागीय संमेलनांपैकी काही संमेलनांची सूची खाली दिली आहे.
सातवे विभागीय साहित्य संमेलन २४,२५ व २६ जानेवारी १९९३
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे चौथे राज्यस्तरीय विद्यार्थी साहित्य संमेलन १० ते १२ डिसेंबर १९९९
साहित्य चर्चा मंच २६ जानेवारी १९९९
काव्य रसिक मंडळ - रौप्यमहोत्सवी संमेलन १९९१- सुवर्णमहोत्सवी संमेलन - फेब्रुवारी २०१६
डोंबिवली - सांख्यिकी
अक्षवृत्त - १९. २१८४३३ ° N
रेखावृत्त - ७३. ०८६७१८ ° E
समुद्रसपाटीपासूनची सरासरी उंची १३. ५३४ मीटर्स [ ४४. ४०३ फूट ]
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पासून डोंबिवली रेल्वे स्थानकाचे अंतर - ४८ किमी
कल्याण रेल्वे स्थानकापासून डोंबिवली रेल्वे स्थानकाचे अंतर - ४ किमी
ठाणे रेल्वे स्थानकापासून डोंबिवली रेल्वे स्थानकाचे अंतर - १४ किमी
पुणे रेल्वे स्थानकापासून डोंबिवली रेल्वे स्थानकाचे अंतर - १४६ किमी
नाशिक रेल्वे स्थानकापासून [ डोंबिवली रेल्वे स्थानकाचे अंतर ] - १४७ किमी
जवळचा विमानतळ - मुंबई - ४९ किमी, पुणे - १४७ किमी
रस्तामार्गे विविध शहरापासून डोंबिवलीचे अंतर
ठाणे - डोंबिवली _ २७ किमी
पुणे - डोंबिवली _ १४४ किमी
नाशिक - डोंबिवली _ १४३ किमी
कल्याण - डोंबिवली _ ०४ किमी
वाहतूक व्यवस्था - डोंबिवली येथे एक्सप्रेस रेल्वे गाड्या थांबत नाहीत. एकतर कल्याण किंवा ठाणे येथे उतरून डोंबिवलीला लोकलने यावे लागते. डोंबिवलीतील एम आय डी सी भागात एसटीचे स्थानक आहे. पुणे, नाशिक, धुळे कोंकणातील अनेक नगरे, उत्तर व पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक नगरांहून डोंबिवलीसाठी एसटी बसेस उपलब्ध आहेत. कल्याण एसटी स्थानकातून उतरून रिक्षा किंवा स्थानिक बसने डोंबिवलीला येता येते. मुंबई, पुणे व नाशिक येथून खाजगी टॅक्सी उपलब्ध आहेत.
डोंबिवलीतील साप्ताहिके – मासिके – वार्षिक अंक
डोंबिवलीच्या साहित्यिक वातावरणाला साजेसे असे प्रकाशनविश्व डोंबिवलीत आहे. या सांस्कृतिक नगरीत अनेक साप्ताहिके, मासिके, व वार्षिक अंक प्रकाशित होतात. डोंबिवलीहून एकही दैनिक जरी प्रकाशित होत नसले तरी मुंबईतल्या सर्व वृत्तपत्रांच्या ठाणे व कल्याण डोंबिवली परिसरासाठी विशेष पुरवण्या आहेत व त्यात या परिसराचा समग्र आढावा रोज घेतला जातो. डोंबिवलीत अन्य भाषिकसुद्धा मोठ्या संख्येने राहात असल्यामुळे मराठीतील सर्व दैनिकांबरोबर भारतातील अनेक नामवंत अन्य भाषिक दैनिके उपलब्ध होतात. डोंबिवलीतून प्रकाशित होणारी काही साप्ताहिके– मासिके- वार्षिक अंक खालीलप्रमाणे आहेत.
लव-अंकुश
नव उद्घोष
डोंबिवली एक्सप्रेस
रंगतरंग
अक्षर सहवास
साहित्यजागर
ओंजळ
सुगंध
अनेक गृहपत्रिका, मुखपत्रे, त्रैमासिके, पाक्षिके, विविध दिवाळी अंक व अनियतकालिके
मी डोंबिवलीकर- सन २००९ पासून हे मासिक प्रकाशित होत आहे. अत्यंत आकर्षक रुपातले व अनेक विषयांना स्पर्श करणारे हे मासिक डोंबिवली साहित्य विश्वातले एक मानाचे पान ठरले आहे. यांचा दरवर्षी प्रकाशित होणारा दिवाळी अंक हा सर्वार्थाने विशेषांक ठरतो. तसेच प्रतिवर्षी डोंबिवलीकर दिनदर्शिका सुद्धा प्रकाशित होत आहे. प्रत्येकवर्षी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या नामवंत डोंबिवलीकरांचा परिचय त्यात दिलेला असतो. त्यामुळे तो कायमस्वरूपी संग्राह्य दस्तऐवज झाला आहे.
डोंबिवलीतील प्रकाशने
डोंबिवली शहराला सांस्कृतिक पार्श्वभूमी आहे व साहित्याची प्रदीर्घ परंपरा आहे. मध्यम वर्गाचे निवास ठिकाण म्हणून ख्याती असलेल्या डोंबिवलीत अनेक लेखक व कलावंत राहातात. या शहरातील सांस्कृतिक- साहित्यिक- कलामय वातावरणाने अनेक साहित्यविषयक चळवळी व घडामोडींना तसेच लेखकांना स्फूर्ती दिली व त्यांना मोठे केले. लेखनापाठोपाठ प्रकाशन व्यवसायसुद्धा ह्या भूमीत रुजला व मोठा झाला. सन १९८० च्या सुमारास डोंबिवलीत व्यावसायिक पातळीवरील प्रकाशन संस्था उदयाला आल्या व प्रकाशन व्यवसायाचा शुभारंभ झाला. आज डोंबिवलीत अनेक प्रकाशक विविध व अनवट विषयांवरील पुस्तके प्रकाशित करत आहेत. व साहित्यविश्वात डोंबिवलीचे नाव सर्वतोमुखी करत आहेत. या प्रकाशकांपैकी काही नामवंत प्रकाशन संस्था खालीलप्रमाणे आहेत.
आरती प्रकाशन- डोंबिवलीतील पहिली प्रकाशन संस्था, अश्वमेध प्रकाशन, दीपरेखा प्रकाशन, दीपाली प्रकाशन, मोरया प्रकाशन, मोहिनीराज प्रकाशन, योगेश्वर प्रकाशन व द्विमित्र प्रकाशन, राधिका प्रकाशन, रावजी प्रकाशन, वंदना प्रकाशन, ॐ शांती प्रकाशन, विनायक प्रकाशन, सुमेरू प्रकाशन
निवेदन- हे संकेतस्थळ ९० वे भारतीय मराठी साहित्य संमेलन २०१७ च्या प्रचारार्थ विकसित करण्यात आले असून यामध्ये नमूद करण्यात आलेला मजकूर, लिंक्स आदी रसिकवाचकांच्या माहितीसाठी उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. त्यासंबंधी कोणत्याही प्रकारची सूचना, आक्षेप असल्यास कृपया आम्हाला जरुर कळविणे. त्याचप्रमाणे, या संकेतस्थळाला साजेशी अशी माहिती, लिंक आपणाकडे असेल व ती येथे देण्यास आपण उत्सूक असाल, तर त्याचेही स्वागत आहे.